Pakistan Balochistan। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील नोकुंडी भागात फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ आत्मघातकी हल्ला झाला. एका प्रकल्पांशी संबंधित परदेशी तज्ञ, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या कामासाठी आणि निवासासाठी बांधलेल्या कंपाऊंडवर हा हल्ला झाला. रविवारी रात्री उशिरा एका बलुच बंडखोर गटाने हा हल्ला केला. समोर आलेल्या माहितीनुसार, बलुच बंडखोर गटाने प्रथम एफसी मुख्यालयाजवळील या संवेदनशील कंपाऊंडवर पाच मोठे स्फोट केले. त्या नंतर सुरक्षा दलांवर गोळीबार केला. बलुच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) ने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाहरम बलोच यांनी एक निवेदन जारी करून याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी या निवेदनात हा हल्ला बीएलएफच्या साधो ऑपरेशनल बटालियन (एसओबी) युनिटने केला आहे. या हल्ल्यात संवेदनशील कंपाऊंडला लक्ष्य करण्यात आले होते, जिथे पाकिस्तान सरकारने खाण प्रकल्पाशी संबंधित परदेशी तज्ञ, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची आणि निवासाची व्यवस्था केली आहे. बलुच बंडखोर गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्षात मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. तथापि, पाकिस्तानी माध्यमांनुसार, बलुचिस्तानमधील नोकुंडी भागात, जो चगाई जिल्ह्यात येतो, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हल्ल्याचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे हा तोच भाग आहे ज्याला पाकिस्तान सरकार जगभरात “सर्वात सुरक्षित” परदेशी गुंतवणूक प्रकल्प म्हणून प्रोत्साहन देत होते. ‘त्या’ प्रकल्पांची पाककडून स्तुती Pakistan Balochistan। पाकिस्तान सरकार जगाला रेको डिक आणि सैंदक खाण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत होते. तसेच जूनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेला रिको डिक खाणीत गुंतवणूक करण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित केले होते. पाकिस्तान दावा करत आहे की ही जगातील सर्वात मोठ्या सोने आणि तांब्याच्या खाणींपैकी एक त्यांच्याकडे आहे, ज्याचे अजूनही योग्य उत्खनन झालेले नाही आणि त्यात ट्रिलियन डॉलर्स किमतीचे सोने आणि तांबे आहेत. काही दिवसांपूर्वीच, पाकिस्तानला रिको डिक खाण प्रकल्पासाठी यूएस एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक (EXIM) कडून सुमारे 35,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचे कर्ज मिळाले. तथापि, प्रकल्पाशी संबंधित परदेशी अभियंते आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कंपाऊंडवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला Pakistan Balochistan। दहशतवादी कारवायांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेला पाकिस्तान सध्या स्वतःच्याच प्रायोजित दहशतवाद्यांमुळे मोठ्या संकटाचा सामना करत आहे. यापूर्वी, 24 नोव्हेंबर रोजी, पेशावरमधील एफसी मुख्यालयात असाच एक आत्मघाती हल्ला झाला होता, ज्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) चा प्रॉक्सी गट जमात-उल-अहरारने घेतली होती.