Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित कश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी गृह मंत्रालयाने कठोर पावलं उचलली असून, आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच, सर्व अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या असून, सर्व जवानांना त्वरित ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमांवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानक, विमानतळ, मेट्रो आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि राज्य पोलिसांना प्रत्येक हालचालीवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून संभाव्य प्रत्युत्तराचा धोका: ‘ऑपरेशन सिंदूर’ने लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांचा नायनाट केला असून, यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून संभाव्य प्रत्युत्तर किंवा दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने ही खबरदारी घेतली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क: गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आणि सीमेवरील कोणतीही संशयास्पद हालचाल तातडीने कळवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे, ज्यात पुढील रणनीती ठरवली जाईल. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत भारताने कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची पूर्ण तयारी केली आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत सुरक्षा यंत्रणांचा हा सतर्क मोड कायम राहील.