Pankaja Munde | Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावर आता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या लढ्याला यश मिळावं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच त्यांना भेटायला तयार आहे, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहन केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मनोज जरांगेंच्या आंदोलनास भेट देण्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. बीड मिळालं असतं तर आनंद झाला असता : पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मला बीड मिळालं असतं तर आनंद झाला असता. मात्र जालना जिल्ह्याचं काम करत असताना माझं जेवढं प्रेम बीड जिल्ह्यावर आहे, तेवढंच प्रेम जालना जिल्ह्यावर देखील असणार आहे. तुमच्या जिल्ह्यानं मला भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार, भेदभाव करणार नाही, असं त्या म्हणाल्या. मनोज जरांगेंना भेटायला तयार : मनोज जरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत, त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. संवैधानिक चौकटीत बसवून त्यांच्या, कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, आज माझा जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो, तिथलं वातावरण कसं असतं ही जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे, ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. मी तसा त्यांना निरोपही पाठवेल, आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.