लाहोर – कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेल्या इंग्लंड संघातील अनेक खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना अज्ञात विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे खेळाडू व सपोर्ट स्टाफ अचानक कसे आजारी पडले याचा शोध आता तेथील वैद्यकीय तज्ज्ञ घेत आहेत.
तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झाला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून (गुरुवार) प्रारंभ होणार होता. इंग्लंडने या सामन्यासाठी आपला अंतिम संघही जाहीर केला होता. मात्र, त्याच्या एक दिवस आधीच खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्य अजारी पडल्याचे वृत्त पसरले व या मालिकेवरही रद्द होण्याचे सावट निर्माण झाले आहे.
इंग्लंड संघातील तब्बल 14 सदस्यांची प्रकृती बिघडल्याने सराव सत्रही रद्द करण्यात आल्याची माहिती इंग्लंड संघ व्यवस्थपनाने दिली आहे. पहिला कसोटी सामना आजपासून रावळपिंडी येथे सुरू होणार होता. या दौऱ्यावर येताना इंग्लंड संघासह खास शेफही आला आहे. मात्र, खेळाडूंना ही बाधा अन्नातून झाली नसल्याचेही येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
तसेच ही करोनाची बाधाही नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता याबाबत विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा आहवाल आल्यावरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली आहे.