पिंपरी | आजीच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क भरले

देहूगाव, (वार्ताहर) – येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास हगवणे यांनी त्यांची आजी स्व. आनंदाबाई हगवणे यांच्या स्मरणार्थ रयत शिक्षण संस्थेच्या दोन शाळांमधील दहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी दत्तक घेतले आहे.
देहूगाव येथील संत तुकाराम विद्यालय आणि कै. शंकरराव मोरे ज्युनियर कॉलेज व जिजाबाई कन्या विद्यालय या दोन्ही शाळांमधील प्रत्येकी पाच असे एकूण दहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च ते करणार आहेत.
पाचवी ते दहावी वर्गातील गोरगरीब होतकरू दहा विद्यार्थी हगवणे यांनी दत्तक घेतले असून त्यांचा वार्षिक शिक्षणाचा खर्च ते करणार आहेत. यातील पाच विद्यार्थ्यांची वर्षिक शैक्षणिक खर्चाची रक्कम त्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी पुजारी यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी विद्या कांबळे, एस.पठाण, विकास कंद, निलेश हगवणे, शिक्षकवृंद उपस्थित होते. ५ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून त्यात यापुढे खंड पडणार नाही, असे हगवणे यांनी सांगितले.





