कराड – देशाला ऑलिम्पिकचे पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे कराड तालुक्यातील गोळेश्वरचे सुपुत्र पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यशासनाचे आभार पत्र लिहून मानले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यात पै. खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी कुस्ती स्पर्धा भरवावी, तसेच कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पै. खाशाबा जाधव यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्या खेळाडूला सन्मानित करावे, अशी मागणीही खा. श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.
पै. खाशाबा जाधव यांचे जन्मशताब्दी वर्ष येत्या 15 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची तेथून घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत खा. श्रीनिवास पाटील यांनी केले असून पत्राद्वारे त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणीस, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना याविषयी पत्र लिहले आहे.
या पत्रात खा. श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे की, माझ्या सातारा लोकसभा मतदार संघातील गोळेश्वर गावच्या छोट्या खेड्यात जागतिक ऑलिम्पिकमध्ये भारतात पहिले वैयक्तीक पदक मिळविणारे पै. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांचा जन्मदिवस 15 जानेवारी महाराष्ट्रात यापुढे क्रीडादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची घोषणा आपण केली आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा सातारकरांना आहे.
पै. खाशाबा जाधव यांच्या नावाने भारतीय पातळीवर कुस्तीप्रकारामध्ये पदक जिंकणाऱ्या पैलवानांना पुरस्कार द्यावा, अशी मागणी यापूर्वी मी लोकसभेत केली होती. महाराष्ट्र शासनाने कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पै. खाशाबा जाधव यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्या खेळाडूला सन्मानित करावे. त्यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच महाराष्ट्रात पै. खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी कुस्ती स्पर्धा भरवण्यात यावी, अशी मागणीही खा. श्रीनिवास पाटील यांनी सदरच्या पत्राद्वारे केली आहे.