Pahalgam: ‘बुकिंग रद्द करू नका, काश्मीरला भेट द्या’, हल्ल्याच्या आठवड्यानंतर आता कसं आहे वातावरण? पर्यटक आणि स्थानिक काय म्हणतात? जाणून घ्या…

Pahalgam: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आठवडाभराने वातावरम हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हल्ल्यानंतर बाजारपेठ बंद झाली होती, मात्र आता ती पुन्हा उघडू लागली आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या पहलगामच्या अर्थव्यवस्थेला पर्यटक न आल्याने धोका निर्माण झाला आहे. तरीही काही पर्यटक पुन्हा येऊ लागले असून, स्थानिक आणि सुरक्षा यंत्रणांच्या पाठबळामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.
पर्यटकांचा अनुभव –
मुंबईचे पर्यटक अक्षय सोळंकी म्हणाले, “हल्ल्याच्या दिवशी गुलमर्गमध्ये असताना आमच्या गटात भीती होती. फ्लाइट तिकीटाचे दर वाढल्याने आम्ही थांबलो. हॉटेलवाल्यांनी आम्हाला आधार दिला, त्यामुळे आम्ही घाबरलो नाही.” हैदराबादचे संतोष कुमार म्हणाले, “वातावरण चांगलं आहे, थोडी भीती आहे.” आणखी एक पर्यटक म्हणाले “हल्ल्याचा विचार मनात येतो, पण स्थानिकांचा पाठिंबा इतका छान आहे की भीती वाटत नाही.”
स्थानिकांची चिंता –
पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांना रोजगाराची चिंता सतावत आहे. शॉल विक्रेते रफी अहमद म्हणाले, “हल्ल्यानंतर पर्यटक येणे थांबले, पण आता हळूहळू येत आहेत. आमचा व्यवसाय पर्यटकांवरच अवलंबून आहे.” ड्रायव्हर मोहम्मद इस्माइल यांनी आवाहन केले, “आम्हाला वेगळे करू नका. आम्ही भारतीय आहोत, आमच्या रोजीरोटीसाठी काश्मीरला भेट द्या.”
कश्मीरियत जपण्याचे आवाहन –
पहलगामचे माजी आमदार रफी अहम मीर म्हणाले, “हल्ल्याने आमच्यावर डाग लागला आहे. स्थानिकांनी जखमींना मदत केली, आदिलसारखे लोक आमच्यात आहेत. हा डाग पुसण्यासाठी एकजुटीची गरज आहे.” अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही पहलगामला भेट देऊन संदेश दिला, “दहशतवाद्यांनी काश्मीरला येऊ नका असे सांगितले, पण आम्ही येणार. काश्मीर आमचा आहे. बुकिंग रद्द करू नका, काश्मीरला भेट द्या. कश्मीरियत आणि काश्मिरींना प्रेम देणे गरजेचे आहे.”
पर्यटकांचा आत्मविश्वास आणि स्थानिकांचा पाठिंबा यामुळे पहलगाम पुन्हा रुळावर येत आहे. कश्मीरियत जपण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी पर्यटकांनी येण्याचे आवाहन केले जात आहे.





