Pahalgam Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये आज दहशतवाद्यांनी 26/11 सारखा हल्ला केला. या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं विचारली आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील, याचा शोध घेतला जात आहे. काही पर्यटक हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
‘या’ संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संस्थेच्या नवीन शूर गट ‘द रेजिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) यांनी घेतली आहे. हा हल्ला “कश्मीरमधील हाय-प्रोफाइल पर्यटकांना लक्ष्य” करण्यात आला असून “भारतीय सुरक्षा दलांची दुर्बलता” दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री





