श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद युसूफ कटारिया असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने २२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रे आणि इतर वस्तूंचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांनी ही अटक केल्याचे सांगितले. त्यांच्या तपासात पुष्टी झाली की कटारियाने दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत करण्यात आणि पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची अटक ही मोठे यश मानले जाते आहे. कटारियाच्या सहकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी आणि दहशतवाद्यांचे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूल कमकुवत करण्यासाठी आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन्स तीव्र करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार पोलिसांनी केला.मोहम्मद युसूफ कटारिया पहलगाममध्ये कंत्राटावर काम करत होता आणि स्थानिक मुलांना शिकवत होता. काही महिन्यांपूर्वी तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्यांना मदत करू लागला. २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची त्यांचा धर्म विचारून हत्या केली होती. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले. त्यानंतर, २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेव अंतर्गत, सैन्याने हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले.