Politics News : “BJPमध्ये जाण्याचा निर्णय चुकीचा होता”; माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीचा भाजपला रामराम
Politics News : केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करणे ही चूक असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये परतण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Politics News : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत के. करुणाकरन यांच्या कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुलीही त्यांनी दिली.
भाजपची विचारधारा पूर्णपणे समजून न घेताच आपण पक्षात प्रवेश केला होता, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय कोणतेही पद किंवा जबाबदारी न मिळाल्यामुळे घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पद्मजा यांनी सांगितले की, भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाची विचारधारा आणि आपले विचार यांच्यात फरक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आता जुनी चूक सुधारण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप सोडण्याची माहिती त्यांनी सर्वात आधी आपले भाऊ आणि केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांना दिली. भावासोबत पुन्हा जवळीक निर्माण होणे ही आपल्यासाठी आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले.
वडिलांनी राजकारणात संधी दिली, पण निवडणुकांत पराभव –
पद्मजा यांनी १९९६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २००१ मध्ये त्यांची केरळ पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरुवात केली. त्यांचे वडील के. करुणाकरन हे केरळचे चार वेळा मुख्यमंत्री होते.
Thiruvananthapuram, Keralam | Padmaja Venugopal, daughter of former Chief Minister and veteran Congress leader K. Karunakaran, quit the BJP.
She says, “My decision to leave the BJP is entirely personal. I have submitted my resignation to Rajeev Chandrasekhar and the BJP national president. Since I joined the BJP, it has not offered me anything in return. This is a personal decision, and I have discussed my decision to leave the party with K. Muraleedharan. It took me some time to understand the BJP’s ideology. However, I will continue to remain active in public life. I was never interested in contesting elections. I have not yet taken any decision on returning to the Congress. If you want me to return, you can do so. I have a positive opinion of the UDF government, and I believe V.D. Satheesan would make a good Chief Minister. I also want the son of A.K. Antony to return to the Congress.”
— ANI (@ANI) November 19, 2026
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुकुंदपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघातूनही त्यांचा पराभव झाला.
मार्च २०२४ मध्ये भाजपमध्ये केला होता प्रवेश –
काँग्रेसमधील दुर्लक्ष आणि पक्षातील नेत्यांसोबतचे मतभेद यामुळे पद्मजा यांनी ७ मार्च २०२४ रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मार्च २०२५ मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय परिषदेवर नियुक्ती झाली. २०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना त्रिशूरमधून उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काँग्रेसमध्ये परतणार का?
भाजप सोडल्यानंतर पद्मजा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये परतण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वडिलांचा राजकीय वारसा आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे केरळमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे





