पुणे जिल्हा | पावसाच्या आगमनाने भात लावणीला सुरुवात

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील नांगरे वाडी, वरवडी खुर्द, कळकदरा, कोळेवाडी, वरवडी डायमुख,पाटणे वाडी, वरवडी बुर्दुक, पळसोशी, नेरे, आंबाडे, खानापूर, उत्रौली, कान्हवडी, गोकवडी, बालवड़ी, निळकंठ, जेधेवाडी,
हातनोशी, बाजारवाडी, मानकरवाडी, पाले, धावडी, राऊतवाडी, भाबवडी, म्हस्के वस्ती,पोळवाडी, फडतरवाडी, थोपटेवाडी या परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. गेले आठ ते दहा दिवस पाऊस गायब झाला होता. परिणामी शेतकरी चिंतेत पडला होता. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाल्याने भात लावणी सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात यंदा अवकाळी पाऊस मे महिन्यात झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाची तयारी करायला वेळ मिळाला. मशागतपूर्व शेतीची कामे नांगरणी, शेतीची आंतरमशागत, बांधबंधीस्ती,वखरणी योग्य वेळेत झाल्याने या भागातील सोयाबीन,भुईमूग,घेवडा,तीळ, कडधान्ये, भात तरवे यांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केली.
भाताची पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धूळवाफेवर पेरणी केली जाते. मात्र, या हंगामात धूळवाफेवर पेरणी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भाताची रोपे या पावसाने तरारु लागली आहेत. पाऊस सुरू झाल्याने भात लावणी सुरू होणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे.
वीसगाव खोऱ्यात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. गेले आठ दहा दिवस पाऊस गायब झाल्याने भात लावणी योग्य रोपं तयार होवूनही पाण्याच्या अभावामुळे भात लावणीला सुरुवात करता येत नव्हती.गावातील कोणत्याही शेतकरी भात लावणी करु शकला नाही. पाऊस सुरू झाल्याने भात लावणी सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.सोयाबीन,भुईमुग,घेवडा,तीळ, कडधान्ये ही पिकं चांगलीच तरारली आहेत. – मनोज खोपडे, प्रयोगशील शेतकरी, आंबाडे (ता.भोर)





