Maval: भातशेतीवर ओढवले दुहेरी संकट; आधी पावसाच्या खंडाने दाणे करपले अन् आता…
Maval: अवकाळीने कापणी केलेला भातही भिजला

पवनानगर – मावळ तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना, आता झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर घातली आहे. आधी पाण्याअभावी दुधावर आलेले भातपीक दाणे न भरताच करपले.
आता ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकासह कापणी करून ठेवलेला भातही भिजला आहे. त्यामुळे मावळातील भात उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच अनियमितता दाखवली. त्याचा थेट परिणाम भातशेतीवर झाला. भातपीक दुधावर असताना पंधरा दिवसांपूर्वी आवश्यक पाऊस झाला असता, तर पिकाला पुरेसा ओलावा मिळून दाणे भरण्यास मदत झाली असती.
मात्र महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने अनेक भागांतील भातपिकाला पाण्याचा ताण सहन करावा लागला. त्यामुळे दाणे पूर्णपणे भरले नाहीत. काही ठिकाणी दुधावर आलेले पीक वाळून गेले, तर काही ठिकाणी भाताची रोपे करपली. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
पाण्याअभावी पिकाचे नुकसान झाले असतानाच, ज्या शेतकऱ्यांचे भातपीक चांगले आले होते, त्यांनी कापणीच्या कामाला सुरुवात केली होती. काही शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवला होता, तर काही ठिकाणी झोडणीसाठी भाताचे गठ्ठे तयार करून ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने या पिकालाही फटका बसला आहे.
शेतात उभे असलेले भातपीक, कापणी करून ठेवलेले भात आणि झोडणीच्या प्रतीक्षेत असलेले पीक पावसात भिजले आहे. त्यामुळे काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
भिजलेले भात पुन्हा उन्हात वाळवणे, त्याची झोडणी करणे आणि सुरक्षित साठवणूक करणे ही कामे आता शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहेत. पावसामुळे भाताची गुणवत्ता घसरण्याची तसेच ओलाव्यामुळे साठवणुकीत नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
वर्षभराचे कष्ट वाया जाण्याची भीती
भातशेतीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच मोठा खर्च करावा लागतो. नांगरणी, रोपवाटिका, लावणी, खते, औषधे आणि मजुरी यासाठी खर्च केला जातो. संपूर्ण हंगामात पिकाची काळजी घेतल्यानंतर उत्पादन हाती येण्याच्या वेळीच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
आधी पावसाच्या खंडामुळे दाणे न भरल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यात आता अवकाळी पावसामुळे तयार झालेले पीकही संकटात सापडले आहे. यामुळे शेतीसाठी केलेला खर्च वसूल होणेही कठीण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
भाताचे अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याने पुढील हंगामासाठी आर्थिक नियोजन कसे करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील भातशेतीचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेण्यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. उभे पीक, कापणी केलेले भात आणि झोडणीसाठी ठेवलेल्या पिकाचे स्वतंत्रपणे नुकसान तपासण्याची गरज आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.





