Pabhe Bhima River Dam : प्रशासनाला मागच्या पुराचा विसर? पाभे येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याचे ढापे अजूनही तसेच
Pabhe Bhima River Dam : नदी कोरडी असतानाही पूल कम बंधाऱ्याचे 'बर्गे' काढण्यास टाळाटाळ; मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसण्यापूर्वी तातडीने कारवाई करण्याची मागणी.

Pabhe Bhima River Dam – पाभे (ता. खेड) येथील भीमा नदीपात्र कोरडे पडले असून येथील पूल कम बंधाऱ्यात देखील पाणी नाही. मागील वर्षी बंधाऱ्याचे (बर्गे) ढापे न काढल्याने पाभे गावात पहिल्याच पावसाचे पाणी शिरले होते. तरीही प्रशासनाला शहाणपण आलेले दिसत नसून बंधाऱ्याचे ढापे काढलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या भीतीने बंधाऱ्याचे ढापे तत्काळ काढण्याची मागणी पाभे ग्रामस्थांनी केली आहे.
मागील वर्षी दिनांक २५ ते २७ मे २०२५ ला भीमाशंकर – भोरगिरी परिसरात मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी भीमा नदीला मोठा पूर आला. पुरामुळे भीमा नदीवरील पाभे गावातील कोल्हापूर पद्धतीच्या पूल कम बंधाऱ्यांचे बर्गे (ढापे) न काढल्यामुळे बंधाऱ्यांवरून मोठ्या पुराचे पाणी गेले. तर पुराच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे पाभे, भोरगिरी गावातील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले होते.
आपत्ती व्यवस्थापनच्या गलथान कारभारामुळे दोन दिवस येथील नागरिकांना वेठीस राहावे लागले होते, तर घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. दिनांक २६ मे २०२५ ला झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला होता. भीमानदीतील पाण्याचा फुगवटा पाभे गावात घुसला होता. काही घरांमध्ये पाणी गेले होते.

पाभे (ता. खेड) : भीमा नदीवरील बंधारा कोरडा झाल्याने त्याचे ढापे काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अचानक नदी तुडुंब भरल्याने आणि गावातील संपर्क तुटल्याने गावातील नागरिक भयभीत झाले होते, याबाबत दैनिक प्रभात ने दिनांक २८ मे २०२५ अंकात “भीमा नदी उफाळली – घरे जलमय” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान यावर्षी अद्यापही या बंधाऱ्याचे ढापे काढले नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जलसंपदा विभाग, खेड पंचायत समिती लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे यावर्षी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने पुलाचे ढापे तत्काळ काढून पुढील धोका टाळण्याची मागणी पाभे, भोमाळे भोरगिरी ग्रामस्थानी केली आहे. खेड तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे ४७ केटीवेअर बंधारे आहेत, ५७ साठवण बंधारे, ६० वळण बंधारे, तर ८१ पाझर तलाव तर राज्यशासनाच्या विभागाकडे ७ बंधारे आहेत.
या बंधाऱ्यांना ढापे (गेट) बसवण्यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत खर्चाची तरतूद करते. मागील वर्षी तालुक्यातील ९२ बंधाऱ्यांना ढापे (गेट) बसवले होते. यावर्षी ९७ बंधाऱ्यांना ढापे (गेट) बसवले होते. आतापर्यंत २९ बंधाऱ्यांचे बंधाऱ्यातील पाणी आटल्याने काढण्यात आली आहेत. जे बंधारे कोरडे झाले आहेत.
त्यांचे ढापे काढण्यासाठी लघु पाठ बंधारे विभागाच्या माध्यमातून १५ एप्रिल २०२६ ला पहिले गेट काढण्याचे सूचना पत्र संबंधित ग्रामपंचायतीना देण्यात आले आहे. या वर्षीच्या टंचाई आराखड्यात गळती होणाऱ्या रासे, पाळू, शेंदुर्ली, औदर पाझर तलाव यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले आहेत.

