हाँगकाँग : भारताची दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूला बुधवारी हाँगकाँग ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तिची वाटचाल डेन्मार्कच्या बिगरमानांकित लाइन क्रिस्टोफरसने रोखण्यात यश मिळवले. पुरुष गटातून एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनी चमकदार कामगिरी करताना स्पर्धेतील वाटचाल कायम ठेवण्यात यशस्वी झाले. गेल्या महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देणाऱ्या सिंधूला या स्पर्धेत राउंड-ऑफ-३२ मध्येच पराभवाचा सामना करावा लागला. एका तासापेक्षा कमी वेळात डेन्मार्कच्या लाइन क्रिस्टोफरसनने तिचे आव्हान २१-१५, १६-२१, १९-२१ असे मोडून काढले. अवघ्या २५ वर्षीय क्रिस्टोफरसनविरुद्ध सिंधूचा हा सहा सामन्यांतील पहिला पराभव आहे. सिंधू पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचे संकेत देत असताना, तिचा हा पराभव झाला. यावर्षाच्या सुरुवातीला स्विस ओपन आणि जपान ओपनच्या पहिल्या फेरीतच सिंधूचे आव्हान संपुष्टात आले होते. सिंधूने पहिल्या गेममध्ये ३-१ अशी आघाडी घेतली होती, परंतु डॅनिश खेळाडूने ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधूने पुनरागमन करताना सलग गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने १३-१२ ने आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर तिने सलग पाच गुण गमावले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कठीण आव्हान दिले. या गेममध्ये दोन्ही खेळाडू एका वेळी १९-१९ ने बरोबरीत होते, परंतु क्रिस्टोफरसनने सलग दोन गुण मिळवून सिंधूचा प्रवास येथे संपुष्टात आणला. जगात ३४ व्या क्रमांकावर असलेल्या एचएस प्रणॉयने चीनच्या लू गुआंग जूचा ४४ मिनिटांत २१-१७, २१-१४ असा पराभव केला. भारतीय शटलर लक्ष्य सेनने तैवानच्या वांग त्झु वेईववर २२-२०, १६-२१, २१-१५ असा विजय मिळवत पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. किरण जॉर्जनेही सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला ३४ मिनिटांत २१-१६, २१-११ असे हरवून पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. महिला दुहेरी व मिश्रमध्ये पराभवाचा धक्का महिला दुहेरीच्या जोडी रुतपर्णा पांडा आणि श्वेतापर्णा पांडा यांना राउंड-३२ च्या सामन्यात हाँगकाँगच्या ओई की व्हेनेसा पांग आणि सुम याऊ वोंग यांच्याकडून अवघ्या २८ मिनिटांत १७-२१, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. चायनीज तैपेईच्या चेन चेंग कुआन आणि ह्सू यिन-हुई यांच्या जोडीने ध्रुव कपिला आणि तनिशा क्रॅस्टो यांचा ३१ मिनिटांत १६-२१, ११-२१ असा पराभव केला.