डॉ. मेघश्री दळवी चंद्रावर वस्ती करण्याचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. स्पेसएक्स, ब्ल्यू ओरिजिन, ऑरबिटल सायन्सेस अशा खासगी कंपन्या त्यात आहेत. अमेरिकेची नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, भारत, जपान, चीन या देशांच्या अवकाश संशोधन संस्थांही तशाच मोहिमा आखत आहेत. चंद्रावर यान नेणं किंवा त्यातून माणसांना घेऊन जाणं हे कठीण नाही. कठीण आहे, तिथे वस्ती केल्यास त्या वस्तीला अन्न, वस्त्र, पाणी आणि अर्थात त्याआधी श्वसनासाठी ऑक्सिजन कसा मिळवायचा हा प्रश्न. चंद्रावर वातावरण नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे कृत्रिमरीत्या ऑक्सिजन तयार करावा लागेल. आज संशोधकांचे अनेक गट या विषयावर काम करत आहेत. चंद्रावर खनिजं मुबलक प्रमाणात आहेत. त्यातली बहुतांशी ऑक्साइड प्रकारची आहेत. या खनिजांपासून धातू वेगळा करताना ऑक्सिजन मुक्त होईल. त्यामुळे धातूनिर्मितीचे कारखाने हेच ऑक्सिजन निर्मिती करू शकतील असा दुहेरी फायद्याचा विचार काही संशोधक मांडतात. मात्र, हे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक पातळीवर उत्पादन करताना शक्य होईल. त्याआधी लागणारा ऑक्सिजन कुठून आणायचा यासाठी दुसरा एक गट चंद्रावरील बर्फाच्या साठ्यातून ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रयत्न कसा करता येईल याकडे लक्ष देत आहे. याव्यतिरिक्त ऑक्सिजन मिळवण्याचा आणखी एक स्रोत चंद्रावर आहे, तो म्हणजे चंद्रावरची धूळ. याला साध्या भाषेत धूळ म्हणत असलो, तरी शास्त्रीय भाषेत त्याला रिगोलिथ म्हटलं जातं. रिगोलिथ म्हणजे एखाद्या ग्रहाच्या वा चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारा माती, धूळ, खडकांचा चुरा, बारीक दगडगोटे यांनी बनलेला एक थर. या चांद्रधुळीत सुमारे 40 ते 45 टक्के ऑक्सिजन आहे. तोही अर्थात या धुळीत धातूंची ऑक्साइड्स आणि सिलिकेट्स असल्याने. त्यामुळेच युरोपियन स्पेस एजन्सी या धुळीतून ऑक्सिजन मिळवण्यावर संशोधन करत आहे. अलीकडेच प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या त्यांच्या पहिल्या प्रयत्नाला चांगलं यश मिळालं आहे. मिश्रधातू बनवण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं अशाच एक तंत्राचा, मोल्टन साल्ट इलेक्ट्रोलिसिसचा वापर करून त्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. आता प्रयोगासाठी चांद्रधूळ कुठून मिळाली हा प्रश्न पडला असेल, तर प्रत्यक्ष चंद्रावरची धूळ न वापरता, तशाच मिश्रणावर हा प्रयोग करण्यात आला आहे. मात्र लवकरच, शक्य तर याच वर्षी चांद्रधुळीचे नमुने आणून त्यावर प्रयोग करण्याचा मानस युरोपियन स्पेस एजन्सीने व्यक्त केला आहे. चांद्रधुळीतून ऑक्सिजन मिळवण्याची रासायनिक प्रक्रिया किचकट असली, तरी ती आणखी सुधारता येईल असा विश्वास युरोपियन स्पेस एजन्सीला आहे. त्यांच्या या प्रयत्नाची दखल जगभर घेतली जात आहे आणि या प्रयोगाला इतर संशोधकांची मदत मिळू शकते. ही प्रक्रिया सोपी, अधिक कार्यक्षम, अधिक परिपूर्ण करता आली, तर चंद्रावर सुरुवातीला ऑक्सिजन मिळवण्याचा प्रश्नच सुटेल. या बातमीमुळे चांद्रमोहिमांवर काम करणाऱ्यांना हुरूप आलेला आहे.