डॉ. म्हैसेकर : सौम्य लक्षणे असतील तरच घरी विलगीकरण
पुणे – करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीस अति सौम्य लक्षणे असतील किंवा कोणतीही लक्षणे नसतील, तर त्या व्यक्तीस घरीच विलगीकरण (होम क्वारंटाइन) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. होम क्वारंटाइन अथवा रुग्णालयात दाखल होणे याचा निर्णय संबंधित व्यक्तींवर अवलंबून असणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. दरम्यान होम क्वारंटाइनसाठी संबधित व्यक्तीस अटी व शर्तींचे पालन बंधनकारक असेल.
डॉ. म्हैसेकर म्हणाले की, करोनाची अतिसौम्य लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइनसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. याबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून त्यानुसार पुण्यामध्येही अशा प्रकारच्या रुग्णांना कोरोनासंदर्भात घरीच विलगीकरण करणे सोपे होणार आहे. करोना रुग्णांमध्ये अतिसौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णाने एक प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
…तर चाचणी करणे आवश्यक नाही
होम क्वारंटाइन व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर 17 दिवसांनंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसतील तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतलेला असेल तेथून 17 दिवसानंतर आणि मागील 10 दिवसांपासून ताप येत नसेल तर गृह विलगीकरणातून व्यक्तीस मुक्त करण्यात यावे. होम क्वारंटाइनचा काळ संपल्यानंतर परत कोविड-19 साठी चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.