Pimpri : रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

भोसरी : भोसरी ते चाकण दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दररोज हजारो नागरिक प्रवास करत असतात. या मार्गावर रिक्षा ही प्रमुख स्वस्त आणि सोयीची प्रवासी वाहतूक सुविधा मानली जाते. मात्र, अलीकडच्या काळात या रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेण्याचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अगदी चालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांमुळे अपघाताचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
प्रत्येक रिक्षामध्ये फक्त तीन प्रवाशांना नेण्याची अधिकृत परवानगी आहे. मात्र अनेक रिक्षाचालक पाच, सहा, अगदी सात प्रवासी घेऊन भरधाव वेगाने रस्त्यावर धावतात. प्रवासी रिक्षाच्या बाहेर अर्धवट लोंबकळत उभे राहतात, प्रौढांसह अगदी लहान मुलेही चालकाच्या शेजारी बसवली जातात. गर्दीच्या वेळी वळण घेण्याच्या क्षणी किंवा अचानक ब्रेक दाबल्यावर हे प्रवासी थेट रस्त्यावर फेकले जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो.
हे प्रकार केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर थेट प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याची गंभीर स्थिती आहे. अनेकदा रिक्षांमध्ये शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक यांचाही समावेश असतो. त्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी पर्याय कमी असल्याने तेही अशा धोकादायक प्रवासाला भाग पडत आहेत. यामागे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि पीएमपीएल बस सेवांचे अपुरे फेरे, तसेच वाढलेले भाडे हे मोठे कारण आहे.
या अनागोंदीला प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे मोठे कारण आहे. भोसरी-चाकण रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतानाही अशा रिक्षा खुलेआम धावत असल्याचे चित्र दिसून येते. अनेक वेळा पोलिसांनी हे प्रकार पाहून देखील कारवाई टाळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी फक्त किरकोळ दंड आकारून रिक्षाचालकांना सोडले जाते, त्यामुळे या प्रकारांवर कुठलाही अंकुश राहिलेला नाही.
नागरिकांनी देखील लवकर पोहोचण्याच्या घाईने नियम मोडणाऱ्या रिक्षांमध्ये प्रवास करण्यास तयार राहणे, ही प्रवृत्ती चिंतेची बाब आहे. रिक्षाचालक याच मानसिकतेचा फायदा घेत निर्भीडपणे नियम झुगारून प्रवास करत आहेत.
बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई आवश्यक
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील आपली सुरक्षा ओळखून अशा रिक्षांमधून प्रवास करणे टाळावे.
अपुरी सार्वजनिक वाहतूक सुविधा
शहराची लोकसंख्या वाढत असताना सुरक्षित व कायदेशीर वाहतूक व्यवस्था उभारणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. अन्यथा एखाद्या अपघातानंतर प्रशासन, रिक्षाचालक आणि प्रवासी सर्वांनाच पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळेत उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.
रिक्षांमुळे अपघाताचा धोका वाढला.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले.
महिला, वृद्ध, विद्यार्थी धोक्यात.
बसफेऱ्या कमी, भाडे अधिक.
वाहतूक पोलीस कारवाई करत नाहीत.
वेळेच्या घाईत प्रवाशांचा धोका.
प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.





