नवी दिल्ली – भारतात हुंड्याच्या लोभाने अनेक दशकांपासून महिलांना मृत्यूच्या आगीत ढकलले जाते आहे. त्याबद्दल सातत्याने बोललेही जाते. मात्र या घटना काही थांबत नाहीत. त्यातच आता उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून समोर आलेले एक हृदयद्रावक प्रकरण खूप चर्चेत आहे आणि हादरवाणारे ठरले आहे. यात निक्की नावाच्या एका विवाहित महिलेचा वेदनादायक मृत्यू झाला. निक्की तिच्या अंगावरच्या कपड्यांना आग लागली असताना पायऱ्या उतरत धावत असून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपला कायदा आणि समाज खरोखरच महिलांना संरक्षण देण्यास सक्षम आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीनुसार, २०२२ या वर्षामध्ये हुंड्यासाठी हत्या करण्यात आल्याचे एकूण ६४५० गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ८० टक्के प्रकरणे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमधील आहेत. या आकडेवारीनुसार, दर तीन दिवसांनी सुमारे ५४ महिला हुंड्यासाठी छळ आणि हत्येला बळी पडल्या आहेत. ही केवळ संख्या किंवा आकडेवारी नाही तर ते देशातील एक अत्यंत वेदनादायक सत्य आहे. हुंड्यासाठी मुलींचा प्रचंड छळ होतो आणि काही वेळा त्यांची हत्याही केली गेल्याच्या अनेक घटना दरवर्षी उघड होतात, परंतु तपास, खटले आणि शिक्षेची संथ प्रक्रिया आरोपींसाठी ढाल बनते असेही निदर्शनास येते. हुंडा विरोधी कायदा १९६१, आयपीसी कलम ३०४ ब आणि ४९८ अ आणि घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ असे कायदे हुंडा विरोधी आहेत. तरीही, उशिरा केला जाणारा तपास आणि खटला, कायदा संस्थांचा अभाव आणि सामाजिक जागरूकतेचा अभाव हे या दुर्दैवी मुलींचे जीव वाचवण्यात अडथळे ठरत आहेत.