Indian passengers stranded in Turkey | मुंबईला निघालेले 200 हून अधिक भारतीय प्रवासी तुर्कीमधील एका दुर्गम विमानतळावर जवळपास 16 तासांपासून अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. रिपोर्टनुसार, लंडनहून मुंबईला जाणारे व्हर्जिन अटलांटिकचे विमान मेडिकल इमर्जन्सीमुळे तुर्कीमधील दियारबाकीर विमानतळावर उतरले. यामुळे 16 तासांपासून प्रवासी विमानतळावरच अडकले आहेत. प्रवाशांना 16 तास तुर्की विमानतळावर का थांबावे लागले? लंडनहून मुंबईला प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या विमानात एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने मेडिकल इमर्जन्सीमुळे विमानाचे लँडिंग करावे लागले. मात्र, VS 358 हे विमान दियारबाकीर विमानतळावर उतरले. येथे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सुविधा नाहीत. लँडिंगच्या वेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आणि दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यासाठी वेळ लागत असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले आहे. व्हर्जिन अटलांटिक एअरलाइनने अद्याप दुसऱ्या व्यवस्थेबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही, त्यामुळे मुंबईच्या पुढील प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये अनिश्चितता आहे. माध्यमांशी बोलताना एका प्रवाशाने सांगितले की, “एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तुर्कीमधील हे विमानतळ विमान हाताळण्यासाठी पुरेसे सक्षम नाही.” प्रवाशांनी एअरलाइनला शक्य तितक्या लवकर वाहतुकीच्या दुसऱ्या साधनाची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. एका प्रवाशाने सांगितले, “आम्हाला निवास व्यवस्था मिळाली नाही आणि आम्ही विमानतळाच्या बाहेरही जाऊ शकत नाही कारण हा लष्करी तळ आहे.” प्रवाशांनी योग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली नसल्याची तक्रारही केली आहे.