कराड – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. ही कारवाई आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. आजअखेर नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर 24 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना 50 लाख 12 हजार 700 रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
करोना या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. दि. 21 मार्चपासून लॉकडाऊन करत जमावबंदी व संचारबंदी लागू केली. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करण्याबरोबर मास्क वापरणे सक्तीचे केले.
यासर्व आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात कराड पोलिसांचे योगदान मोठे आहे. विशेष करून येथील वाहतूक शाखेने वाखाण्ण्याजोगे काम केले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 21 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन झाल्यापासून करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी व लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाबरोबर वाहतूक शाखेने वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करून संचारबंदी यशस्वी करण्याचा खारीचा वाटा उचलला आहे.
दि. 21 मार्च 2020 ते 30 जून 2020 या अखेर कराड वाहतूक शाखेने एकूण 24 हजार 204 इतक्या केसेस करून 50 लाख 12 हजार 700 रूपये दंड केला आहे. जून 2020 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिथील केल्यानंतर काही वाहन चालक संचारबंदी नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आले. अशा वाहनांवर कराड वाहतूक शाखेकडून कठोर कारवाई करत दि. 1 जुलै 2020 ते दि. 11 जुलै 2020 दरम्यान 1 हजार 188 गुन्हे दाखल केले तर 14 लाख 91 हजारांचा दंड केला आहे.
याशिवाय चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आदी गुन्हे रोखण्यासाठी फॅन्सी नंबर प्लेट तसेच नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्यांवर जागीच दुरूस्त करून घेण्यात आल्या आहेत. मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे वाहन चालक परवाना रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत तर नो पार्किंग तसेच वाहतुकीस अडथळा येईल अशा वाहनांवरही कारवाईचा सपाटा लावला आहे.
या शिवाय वाहन धारकांना व व्यावसायिकांना सूचना करण्यात येत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपूते, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे व 43 वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी केली आहे. या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी कौतुक केले आहे.