भूज बैठकीत ठरणार राममंदिर सोहळ्याची रूपरेषा

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक येत्या पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान कच्छ प्रांतातील भूज येथे होणार असून, या बैठकीत येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराममंदिर अभिषेक सोहळ्याची रूपरेषा ठरणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सभा सुरू होईल आणि सात नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता संपेल.
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याविषयी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. श्रीराममंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात प्रस्तावित कार्यक्रमांविषयीही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. याशिवाय देशभरात प्रत्येक शहरात आणि गावातील मंदिरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्याविषयीची रुपरेषाही या बैठकीत ठरणार आहे.
या बैठकीत संघाच्या रचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या एकूण 45 प्रांतातील प्रांतीय संघचालक, कार्यवाह आणि प्रांत प्रचारक आणि त्यांचे सह संघचालक, सहकार्यवाह आणि सहप्रांतप्रचारक सहभागी होणार आहेत. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे आणि सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर आणि कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ यासह विविध समविचारी संघटनांचे निवडक संघटनमंत्रीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
आणखी या गोष्टींवर होणार चर्चा
- संघाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार
- सप्टेंबरमध्ये पुण्यात झालेल्या अखिल भारतीय बैठकीतील विषयांचाही आढावा घेणार
- सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या विजयादशमीनिमित्त झालेल्या भाषणातील मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
- सन 2025 मध्ये संघ कार्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. संघकार्यविस्तार योजना, देश ते शाखा पातळीवरील उद्दिष्टे त्यांची पूर्तता आदींचा आढावा घेणार.
- सामाजिक परिवर्तन, सुसंवाद, पर्यावरण, पाण्याची बचत, प्लॅस्टिकचा कमी वापर, आनंदी कुटुंब, सामाजिक कार्य करणारे कुटुंब निर्मिती, स्वदेशी, नागरी कर्तव्य या डॉ. भागवत यांच्या आवाहनाची पूर्तता कशी करणार याविषयी चर्चा होणार.





