पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी पदयात्रा, गणेश मंडळांच्या भेटी, कार्यकर्त्यांबरोबर दिवसाचे नियोजन, निवडक मतदारांच्या व्यक्तिगत भेटी-गाठी, संघटनेतील पदाधिकाऱ्यांसमवेत व्यूहरचना निश्चिती अशा व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत “प्रभात’शी साधलेला विशेष संवाद. तुम्ही या निवडणुकीकडे कसे बघता? आमदार मुक्ताताई टिळक भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या निधनामुळे या निवडणुकीला दुःखाची झालर आहे. परंतु कर्तव्यकठोर भावनेतून विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि मित्रपक्षांतर्फे मी ही निवडणूक लढवत आहे. भाजप सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक लढवत असल्याचा आरोप होत आहे. हा आरोप बिनबुडाचा आहे. भाजपची रणनीती ही कायमच विकासाची आणि विचारांची राहिलेली आहे. कसबा हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे, हे निर्विवाद वास्तव आहे. येथील मतदार हा वैचारिक बांधिलकी मानणारा आहे. राष्ट्रीयत्वाचा विचार, हिंदुत्वाचा विचार हा येथील मतदाराच आत्मा आहे. हा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाचा विचारच करीत नाही. खासदार गिरीश बापट यांनी या मतदारसंघातील प्रत्येक घटकाला भाजपशी घट्ट जोडलेले आहे. त्याच्या मनात विश्वास निर्माण केलेला आहे. महाविकास आघाडीने तुमच्याविरुद्ध उभ्या केलेल्या आव्हानाकडे तुम्ही कसे बघता? कसबा मतदारसंघ हा विचार आणि विश्वासाने भाजपशी बांधला गेलेला आहे. कसब्यात भाजपच्या वर्चस्वाला वैचारिकतेशी देणं-घेणं नसलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने आव्हान देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे खरे स्वरुप या मतदारांसमोर आणणे एवढेच पुरेसे आहे. सतत पक्ष बदलणाऱ्यांना हा मतदारसंघ कधीच थारा देत नाही. कसब्यातील विकासकामांबाबत तुम्ही काय सांगाल? भाजप संपूर्ण शहराच्या सर्वांगिण विकासासाठी वचनबद्ध आहे. कसब्याचा विचार करता लवकरच कार्यान्वित होणाऱ्या स्वारगेट-पिंपरी चिंचवड या मेट्रो मार्गामुळे पेठेतल्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. याशिवाय “पुण्यदशम’सारखी किफायतशीर दरात प्रवासाची योजना, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेला दिलेली गती, नदीसुधारणा प्रकल्प अशा अनेक योजना सांगता येतील. सामान्य माणसाला करोनाच्या तडाख्यातून बाहेर काढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मोफत धान्य वितरण सुरू आहे. ते आणखी एक वर्ष सुरू राहील. फेरीवाले, पथारीवाले यांच्यासाठी स्वनिधी योजना आणत ती राबवण्यात आली. बेरोजगारांच्या कौशल्य विकासासाठी “लाइट हाऊस’ प्रकल्पांचा विस्तार झाला. विकासाची ही यात्रा अखंड पुढे नेणे याच निर्धारातून आम्ही ही पोटनिवडणूक लढवत आहोत.