Sanjay Raut | Adani – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रचार करत असताना, पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढणारे ठाकरे बंधू महायुतीच्या तुलनेने संयमित प्रचार करताना दिसून आले आहेत. नाशिक आणि दादर येथील दोन संयुक्त सभांमध्ये त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केल्यानंतर, अंबानींबाबत मौन का? असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, आमची भूमिका उद्योगविरोधी कधीच नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांचे स्पष्ट मत होते की उद्योग वाढले तर रोजगार वाढतो. मालक जगला तर कामगार जगतो. भांडवल, गुंतवणूक आली पाहिजे, कारण त्यातून राज्याचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अंबानींसारख्या उद्योगसमूहांविरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट करताना त्यांनी अंबानींची बाजू घेतली. राऊत पुढे म्हणाले की, प्रश्न एखाद्या उद्योगपतीचा नाही, तर सरकारच्या धोरणांचा आहे. भाजप सरकारने एका ठराविक उद्योगपतीसाठी ‘वन विंडो सिस्टीम’ उभी केली आहे. नियम, कायदे, पर्यावरण, स्थानिक हित याकडे दुर्लक्ष करून जर सगळी यंत्रणा एका उद्योगपतीसाठी वाकवली जात असेल, तर त्याला आम्ही विकास म्हणू शकत नाही. ती सरळसरळ लूट आहे. अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाहीत. त्यांनी उद्योग उभारले, रोजगार निर्माण केला. पण कोणत्याही उद्योगाला विशेष सवलती देऊन सामान्य जनतेच्या हक्कांवर गदा आणली जात असेल, तर त्याला विरोध करणे गरजेचे आहे, असे म्हणताना त्यांनी उद्योजक गौतम अदानींचे नाव न घेता टीका केली. अदानींच्या विस्ताराला मर्यादा नाहीत संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही उद्योगपतीने मुंबई, महाराष्ट्र किंवा देशात व्यापार करायला हरकत नाही, मात्र अदानींच्या विस्ताराला मर्यादा उरलेल्या नाहीत. मुंबईत लहान-लहान भूखंडांवरही अदानींचा ताबा वाढत असून, घाटकोपर दुर्घटनेचा भूखंडही अदानीकडे असून तिथे इमारती उभ्या राहत आहेत. टाटा, अजीम प्रेमजी, बिर्ला, नारायण मूर्ती यांसारख्या उद्योगपतींनी देशाच्या विकासाला चालना दिली असून त्यांच्याविरोधात कधी आक्षेप नव्हता. अदानी भ्रष्टाचाऱ्यांचा पोशिंदा असून मुंबई-महाराष्ट्रावर त्यांचा विशेष डोळा आहे, म्हणूनच त्यांच्याशी आमची लढाई आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.