“आपल्या बातम्यांचे चॅनेल विनोदाचे विषय”; न्यूज चॅनेल्सच्या वार्तांकनावर सोनाक्षी भडकली, थेट पोस्ट लिहित घेतला समाचार

Sonakshi Sinha : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना लक्ष केले होते. ८ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे शेकडो ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्याशी संबंधित सर्व अपडेट्स सर्व वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले. मात्र, बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने वृत्तवाहिनींनी केलेल्या कव्हरेजवर संताप व्यक्त केला आहे. याविषयी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून संरक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे शेअर करत मीडिया चॅनेल्सना ‘विनोद’ अशा खोचक शब्दांत संताप व्यक्त केला.
टेलीव्हिजनवरील वृत्तवाहिन्यांकडून करण्यात येत असलेल्या कव्हरेजबाबत संरक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. हिच मार्गदर्शक तत्वे सोनाक्षीने तिच्या इन्स्टावर शेअर केली. या मार्गदर्शक तत्वांमध्ये संरक्षण मंत्रालयाने “सर्व माध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सामान्य जनतेला सुरक्षा दलांच्या कारवाया किंवा संरक्षण कारवायांचे थेट वृत्तांकन किंवा रिअल-टाइम कव्हरेज टाळण्याचा सल्ला दिला आहे.”संवेदनशील किंवा स्त्रोतांशी संबंधित माहिती उघड केल्याने ऑपरेशनच्या यशावर परिणाम होऊ शकतो, असे सरंक्षण मंत्र्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे.
तुम्ही काय करत आहात?
सोनाक्षीनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट पुन्हा शेअर केली. हे करत असताना ती मीडिया चॅनेल्सबद्दल खूपच आक्रमक दिसली. तिने लिहिले “आपल्या बातम्यांचे चॅनेल विनोदाचे विषय बनले आहेत. मी अति नाट्यमय दृश्ये, ध्वनी प्रभाव आणि ओरडण्याने कंटाळले आहे. तुम्ही काय करत आहात? फक्त तुमचे काम करा. सत्य बातमी द्या.” असे म्हणत सोनाक्षीने याविषयी वार्तांकन करणाऱ्या चॅनल्सवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सर्व गोष्टी अतिशयोक्ती करणे आणि लोकांमध्ये भीती पसरवणे थांबवा. तरीही लोक काळजीत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त हा गोंधळ. माझी लोकांना विनंती आहे की- एक विश्वासार्ह बातमी स्रोत शोधा आणि त्याच्याशी अपडेट रहा. ‘बातम्या’चे वेश दाखवणारे हे निरर्थक नाटक पाहणे थांबवा!” असे देखील तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे.





