Suriya Jyothika: ‘आमचं लग्न परफेक्ट नाही…’; 20 वर्षांनंतर सूर्या-ज्योतिकाने पुन्हा घेतल्या लग्नाच्या शपथा, व्हिडीओ व्हायरल
Suriya Jyothika सूर्या आणि ज्योतिका यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघांच्या नात्याला वेगळी दिशा मिळाली आणि पुढे त्यांनी लग्न केलं.

Suriya Jyothika: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका. दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडलीच, पण त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही कायम चर्चेत असते. लग्नाला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही दोघांमधील प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. आता त्यांच्या लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त दोघांनी पुन्हा एकदा लग्नाच्या शपथा घेतल्या आहेत. या खास सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Suriya Jyothika)
सूर्या आणि ज्योतिका यांनी आपल्या लग्नाचा 20 वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. यासाठी चर्चमध्ये एका छोटेखानी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला कुटुंबातील काही जवळचे सदस्य आणि मित्रमंडळी उपस्थित होती. या खास प्रसंगी ज्योतिका पांढऱ्या रंगाच्या सुंदर ब्रायडल गाऊनमध्ये दिसली. तर सूर्या पांढऱ्या रंगाच्या सूट जॅकेटमध्ये आणि काळ्या ट्राउझरमध्ये दिसत होता. (Suriya Jyothika)
ज्योतिका चर्चमध्ये येताच सूर्या भावुक झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्योतिका समोर येत असताना त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. हा भावुक क्षण पाहून उपस्थितांनाही भावना अनावर झाल्या. सूर्या यांचा भाऊ आणि अभिनेता कार्तीही या सोहळ्यात उपस्थित होता. भावुक झालेल्या सूर्या यांना कार्तीने आधार दिल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Suriya Jyothika)
या खास सोहळ्यात सूर्या आणि ज्योतिकाने एकमेकांना अंगठ्या घातल्या. तसेच पुन्हा एकदा आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन दिलं. लग्नाच्या 20 वर्षांनंतरही दोघांनी अशा पद्धतीने आपल्या नात्याचा खास क्षण साजरा केल्याने चाहत्यांमध्ये या जोडीची चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ ज्योतिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबत तिने एक भावुक पोस्टही लिहिली आहे. विशेष म्हणजे, ही पोस्ट ‘परफेक्ट मॅरेज’बद्दल नसल्याचं तिने स्पष्ट केलं. नात्यामध्ये येणाऱ्या अडचणी, तडजोडी, समजूतदारपणा आणि एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करणं याचा हा उत्सव असल्याचं ज्योतिकाने सांगितलं. (Suriya Jyothika)
ज्योतिकाने सूर्या यांचा एक चांगला जोडीदार, मित्र आणि मुलांचा जबाबदार वडील म्हणूनही उल्लेख केला. आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्यासोबत असल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. एकमेकांच्या कमतरता स्वीकारून आणि एकमेकांना समजून घेत पुढे जाणं, हेच नात्याचं महत्त्व असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून येतं.
या खास सोहळ्यात सूर्या आणि ज्योतिकाची मुलं दीया आणि देवही सहभागी झाले होते. चर्चमधून बाहेर येताना कुटुंबीय आणि मित्रांनी दोघांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या क्षणांचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
सूर्या आणि ज्योतिका यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघांच्या नात्याला वेगळी दिशा मिळाली आणि पुढे त्यांनी लग्न केलं. आता लग्नाच्या 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा शपथा घेतल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी हा क्षण खास ठरला आहे. सोशल मीडियावर चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.





