आमचा आनंद हरपला !!! ठाण्यातील आनंद आश्रमात पैशांची उधळण; केदार दिघेंनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

Anand Ashram Thane | शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी चक्क आनंद आश्रमात नोटांची उधळण करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे.
आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात ठाणेकरांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलानंतर हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु या कार्यालयात नोटा उधळतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकारावर उद्धव गटाचे केदार दिघे यांनी “तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या, दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला” असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. Anand Ashram Thane |
तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या ….
दिघेसाहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले…
आमचा आनंद हरपला ! @TV9Marathi @saamTVnews @zee24taasnews @abpmajhatv @lokmat @SaamanaOnline pic.twitter.com/C5xKkoaTvk— Kedar Dighe (@MiKedarDighe) September 13, 2024
दरम्यान, गौरी गणपतीची विसर्जन मिरवणूक दरवर्षी यंदाही गुरुवारी आनंद आश्रमासमोर जाताना ढोल ताशा पथकासह लहान मुले आश्रमात गेली. त्याठिकाणी ढोल ताशा पथकाच्या ठेक्यावर मुले नाचत होती. मात्र यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Anand Ashram Thane |
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया
शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी “गणेशोत्सवानिमित्त ढोल पथक आनंद मठात येणं ही परंपरा आहे. दिघे साहेब असतानाही गणपती विसर्जनावेळी अशा प्रकारे लहान मुलं ढोल वाजवत त्यांना भेटायला यायचे. त्यावेळी दिघेसाहेब बक्षीस म्हणून त्यांना पैसे द्यायचे. परंतु काही लोक आनंद आश्रमातील व्हिडीओ चुकीचे पद्धतीने प्रसारित करत आहेत. तसेच चुकीच्या पद्धतीने पैसे उधळणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे,” अशी माहिती दिली आहे.
हेही वाचा:
16 सप्टेंबरची शासकीय सुट्टी रद्द; अनंत चतुर्दशी असल्याने महाराष्ट्र सरकारने केला तारखेत बदल





