निवडणुकीनिमित्त शिवेसेनेची पुण्यात आढावा बैठक पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांच्या मुलाखतींची मोहीम सुरू झाली आहे. तर शिवसेनेत “मुलाखती’ नाही तर “आदेश’ असतो. त्यामुळे मुलाखतीचा प्रश्नच येत नाही. मात्र, मतदारसंघात पक्षाची ताकद काय आहे, जनतेचा कौल कोणाकडे, पक्षवाढीसाठी आतापर्यंत काय केले, कोणते कार्यक्रम घेतले आणि पुढे कशाप्रकारचे नियोजन केले, त्याबाबतचा आढावा शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी विभागाप्रमुखांकडून शुक्रवारी घेतला. पुण्यातील शिवसेना भवन येथे मिर्लेकर आणि कदम यांनी सर्व विधानसभा मतदारसंघातील विभागप्रमुखांना बोलावून आढावा बैठक घेतली. मात्र, ही बैठक एकत्र न घेता स्वतंत्र घेण्यात आली. परंतू, याची माहिती काही इच्छुकांना मिळताच त्यांनी शिवसेना भवन येथे हजेरी लावली. दरम्यान, विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा “बायोडेटा’ विधानसभा आणि शहरस्तरावरून पक्षप्रमुखांकडे याआधीच गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मतदारसंघातील आढावा आणि पक्ष घरा-घरापर्यंत पोहचविण्यासाठी काय नियोजन केले याचा आढावा नेत्यांनी घेतला. त्यामध्ये काही मतदारसंघात इच्छुकांच्या माहिती आणि त्यांचा जनसंपर्क याबाबत माहिती घेतली. युती होणार की नाही? याचा विचार न करता मतदारसंघातील पक्षाची ताकद कशी वाढेल त्याकडे लक्ष द्या असे सांगत इच्छुकांची माहिती आणि किती सक्रीय आहे याची माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.