नागपूर – निवडणूक आयोगाच्या कारभारावर सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले आहेत. आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत, निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. पटोले म्हणाले, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो की निवडणूक आयुक्त असो ते संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. आम्ही राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे की, त्यांनी आर्टिकल 243 अंतर्गत राज्यच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणला पाहिजे. राज्य सरकार प्रस्ताव आणणार नसेल तर, निवडणूक आयोग व राज्य सरकार यांचे साटेलोटे असल्याचे उघड होईल. गडचिरोलीत तहसीलदाराला स्वतः निवडणूक आयोग ईव्हीएमची बॅटरी बदलवायला सांगतात, मग 18 दिवस ईव्हीएम सुरक्षित राहील का? याबद्दल आम्हाला शंका आहे. राज्य सरकार महाभियोग आणणार नसेल तर,आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विदर्भातून येतात. विरोधी पक्षात असतांना ते दोन महिने हिवाळी अधिवेशन चालावे, अशी मागणी करायचे. आता एक महिना हिवाळी अधिवेशन राहावे, ही आमची मागणी असल्याचे पटोले म्हणाले.