अकोले (प्रतिनिधी) – कोणताही अधिकारी आपल्या कामात दिरंगाई व अरेरावी करीत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबी देत कामात सुधारणा करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेल्या जनता दरबारात अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जनतेच्या तक्रारीचे निरसन करा. अकोले तालुक्यात जास्तीत-जास्त सबस्टेशनची उभारणी करा. त्यासाठीचे प्रस्ताव पाठवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आ.डॉ. किरण लहामटे, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर, कपिल पवार, विनोद हांडे, विकास शेटे, बबन वाळुंज कार्यकर्ते उपस्थित होते. मोवाडे यांच्याबाबत सर्वाधिक तक्रारी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राजूर विभागातील वीज वितरण अधिकारी मोवाडे यांच्याबाबत जास्त तक्रारी असून त्यांना यावेळी कामात सुधारणा करण्याबाबत संधी देण्यात आल्याचे सांगितले. अकोलेचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश बागूल यांच्या कामांचे कौतुक केले. मंत्री तनपुरे म्हणाले की, राजूर भागातील वीज वितरणच्या अनेक तक्रारी येत असून त्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी. विजेच्या पोलवरील तारांचा झोळ पडला असेल, विजेचे पोल नसतील, वीज चोरी होत असेल तर या बाबींकडे लक्ष द्यावे. जनता दरबारात सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जनतेच्या तक्रारीला उत्तरे द्यावीत.आदिवासी भागात मीटर असूनही त्यांना लाकडी खांब उभे करून वीज न्यावी लागते. मग तेथील विजेचे खांब कोठे गेले? याचा तपास करा, अशा सूचना दिल्या. लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. त्यांच्या सूचनांना जुमानत नाही, ही बाब गंभीर असून तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी दिली. यावेळी आ.डॉ.किरण लहामटे, सीताराम गायकर यांनी काही सूचना केल्या.