मुंबई – राज्यातील एकूण २४ नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. मात्र, या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तसेच 17 (1ब) तरतुदीनुसार उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या. त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती आयोगामधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषद अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील निवडणुकांना एक दिवस उरलेला असताना पुढे का ढकलल्या. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम क आणि ड प्रमाणे देण्यात आला आहे आणि त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका २० डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. राज्यातील २४ नगरपालिका मधील नगराध्यक्ष आणि १५० च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली आहे. नगराध्यक्ष पदासाठी जनतेमधून नगराध्यक्ष निवडून येणार, त्यामुळे तिथे एकदाच मतदान होणार. काही प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रभागातील निवडणुकांसाठी दुसऱ्यांदा मतदान करावे लागणार आहे. जिथे जिथे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या ठिकाणच्या 24 निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले असून पुढे ढकललेल्या निवडणुकांमध्ये नव्याने उमेदवाराला अर्ज भरता येणार नाही, फक्त अर्ज मागे घेता येणार असून चिन्ह वाटप आवश्यकतेनुसार होईल, असेही सांगण्यात आले.