बाणेर येथील तुकाई टेकडीवर वृक्षदिंडीचे आयोजन

औंध (वार्ताहर) – तुकाई टेकडी बाणेर येथे वसुंधरा अभियान व सह्याद्री देवराई तर्फे वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरामध्ये तसेच टाळ मृदंग वाजवत वृक्ष दिंडी काढण्यात आली होती.
यावेळी वसुंधरा अभियान सदस्य तसेच परिसरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये या दिंडीमध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. “कापूर भीमसेनी” या दुर्मिळ औषधी वनस्पतीची निवड करून पालखीमध्ये हे झाड ठेवून टेकडीवरती दिंडी काढण्यात आली.
सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी ३९१ व्या शिवजयंती निमित्त गड-किल्ल्यांवर ४०० झाडे लावण्याचे आवाहन केले होते याला प्रतिसाद म्हणून यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
टेकडीवर वसुंधरा सदस्यांनी झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक टाक्या बांधल्या आहेत, त्यातील एकोणतिसाव्या ‘सावित्री’ टाकीचे उद्घाटनही सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच कदंब या झाडाचे वृक्षारोपण ही त्यांच्याकडून करण्यात आले.
या वेळी शिंदे यांनी, वृक्षदिंडी निमित्त प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवले पाहिजे आणि ही हिरवी मशाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटत ठेवली पाहिजे, महाराष्ट्र हिरवागार झाला पाहिजे ही सदिच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमास सह्याद्री टीमचे सदस्य अरविंद जगताप, अमोल जाधव, सचिन चंदने, तसेच पुणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संदीप काळे ही उपस्थित होते.







