कहर ! करोनाची पीडा घालवण्यासाठी गुजरातमध्ये मिरवणुकीचे आयोजन; 23 जणांना अटक

अहमदाबाद – करोनाची पीडा घालवण्यासाठी गुजरातमधील एक गावात धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्या मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम धाब्यावर बसवण्यात आले. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कारवाई करत सरपंचासह 23 जणांना अटक केली.
अहमदाबाद जिल्ह्यातील नवापुरा गावात दोन दिवसांपूर्वी संबंधित मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या. त्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली. संबंधित घडामोडीमुळे वादंग निर्माण होण्याची चिन्हे असल्याने पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
करोनाविषयक नियमांचा भंग करून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याबद्दल आधीच कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. करोनाच्या दुसऱ्या लाटेने गुजरातमधील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यातून राज्य सरकारने अनेक शहरांत रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. त्याशिवाय, राज्यभरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत गर्दी होऊ शकणाऱ्या सर्व कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे.

