जामखेडमध्ये 3 मार्चला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जामखेड – राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयात येत्या ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे (National Lok Adalat) आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळवून घ्यावा असे, आवाहन जामखेड न्यायालयाचे दिवाणी व प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष वैभव जोशी यांनी केले आहे.
लोक अदालतीच्या माध्यमातून पक्षकारांचा वेळ, पैसे आणि कष्ट वाचवत आपले प्रकरण निकाली काढता येणार आहे. तसेच न्यायालयांवर असलेल्या खटल्यांचा ताणदेखील कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये दिवाणी, तडतोडपात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भुसंपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच शासकीय अस्थापनांची थकीत वसुली अशी दाखलपुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.
त्यासाठी साखर कारखाने, वित्तीय संस्था, बँका, महावितरण, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विमा कंपन्या, शासकीय कार्यालये यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्व तयारी करण्यात आली आहे. लोक अदालतीसाठी प्रलंबित, व दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.
तसेच, मोटार वाहन कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेले प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी केले आहे.





