भय इथले संपत नाही

संघटित गुन्हेगारी : वर्षभरात 180 गुन्हे, दहशत माजविण्याचे प्रयत्न
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रत्येक महिन्याला एकतरी वाहन तोडफोडीची घटना घडत आहे. पोलीस आरोपींना पकडून कारवाई करतात. मात्र, वाहन तोडफोडीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. याला कारण पोलिसांचा कमी झालेला वचक आणि प्रत्येक गल्लीबोळात वाढीस लागलेली संघटित गुन्हेगारी आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असली तरी गुन्हेगारांकडून दहशत माजविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. या वर्षी पिंपरी, वाकड येथील वाहन तोडफोडीच्या घटनेनंतर निगडीत घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
आयटी हबमुळे पिंपरी चिंचवडचे नाव जगाच्या नकाशावर आले. तर दुसरीकडे बेस्ट सिटी, क्लीन सिटी असे अनेक पुरस्कार मिळाल्याने देशाचेही लक्ष शहराकडे वेधले गेले. आपले शहर शिक्षणाची पंढरी, उद्योग नगरी, कामगार नगरी असल्याने देशाच्या विविध भागातून नागरिक वास्तव्यास आले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढता आहे. यामुळे आता शहराची क्राईम सिटी म्हणून ओळख निर्माण होताना दिसत आहे.
यंदाच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 14 जानेवारी रोजी पिंपरीतील संजय गांधी नगर आणि काळेवाडी परिसरात एका टोळक्याने तोडफोड केली. दुसऱ्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अजंठानगर येथे एका टोळक्याने तब्बल 13 वाहनांची तोडफोड केली. तोडफोडी या घटना शहरात प्रथम घडल्या आहेत असे नाही. गेल्या अनेक वर्षापासून तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पुणे आयुक्तालयात असताना डॉ. बसवराज तेली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी वीटकर टोळीने नेहरूनगरमध्ये वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. तेली यांनी या टोळीला मोक्का लावला. मात्र तरीही अशा घटना रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
संघटित गुन्हेगारांकडूनही तोडफोड
9 ऑक्टोबर 2015 रोजी सोन्या काळभोर टोळीने भोसरीत 40 ते 50 वाहनांची तोडफोड केली होती. तर देहूरोडमध्ये खून झालेल्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या दिवशी फटाके फोडून वाहनांची तोडफोड केली होती. तर गेल्यावर्षी रावण टोळीच्या समर्थकांनी निगडी आणि आकुर्डी भागात तोडफोड केली होती. 27 ऑक्टोबर 2015 रोजी शाहूनगर भागात 25 वाहनांची तोडफोड केली होती. 9 जानेवारी 2018 मध्ये एकाच रात्रीत पिंपरीत आणि थेरगाव परिसरात वाहन तोडफोडीच्या दोन घटना घडल्या होत्या.
गुन्हेगारांना राजकीय आश्रय
सराईत गुन्हेगार नसले तरी वर्चस्वासाठी गल्लीबोळात अनेक “भाई’ निर्माण झाले आहे. अशा या “भाईं’चा निवडणुकीत राजकीय वापर केला जातो. एकीकडे गुन्हेगारी वाढल्याचा टाहो फोडायचा आणि दुसरीकडे गल्लीपासूनच गुन्हेगारीला खतपाणी घालत गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पोसायचे असे तंत्र राजकीय पक्षांकडून सुरू आहे.
सर्वसामान्यांचे नुकसान
गल्लीबोळात निर्माण झालेले भाई आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वाहनांची तोडफोड करतात. मात्र यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. वाहनांचा विमा असतो. मात्र काचेची तोडफोड झाल्यावर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा भाईगिरीचा भुर्दंड सोसावा लागतो.
त्या कायद्याचा वापर व्हायला हवा
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास आरोपींकडून नुकसान भरपाई घेण्याचा कायदा आहे. अशाच प्रकारचा कायदा खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आरोपींकडून वसूल करण्याचाही आहे. तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी काळेवाडी येथील खासगी बस पेटविणाऱ्या आरोपींकडून नुकसान वसूलीसाठी कार्यवाही केली होती. मात्र त्यांची बदली झाल्यावर हा पुढील कार्यवाही झाली नाही. मात्र आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता विकून नुकसान भरपाई करण्याची सुरुवात झाल्यावरच आरोपींना वचक बसेल, अशी नागरिकांची मागणी आहे.





