वडगाव मावळ (किशोर ढोरे) – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तळेगाव व लोणावळा नगर परिषद, वडगाव नगर पंचायत आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून मतांच्या पेरणीला सुरुवात केल्याचे दिसत आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव व लोणावळा नगर परिषद, वडगाव नगर पंचायत आणि देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवीन इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. अनेकांना आतापासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीची आस लागली असून, राजकीय गणिते पटलावर मांडण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने होत असलेला गण आणि गट रचना विचारात घेता नवीन आराखड्यानुसार कोणत्या गटात किंवा गणात निवडणूक लढवायची याबाबत अद्याप इच्छुक संभ्रमात आहेत.
तरीही नवीन गण व गट रचना कशीही पडली तरीही निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या इच्छुकांनी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यत, इतर स्पर्धांच्या जोरावर मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अनेक तथाकथित राजकीय नेते क्रिकेटच्या मैदानात आणि बैलगाडा शर्यतीच्या घाटात हजेरी लावत आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून लाखोंच्या बक्षिसांची उधळपट्टी केली जात आहे. यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. मावळच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात सध्या टेनिस बॉल क्रिकेटचे फिवर आहे. गावोगावी अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. विविध संघटना, संस्था, क्रिकेट क्लब स्पर्धा भरवत असून, त्यास राजकीय पाठबळ मोठ्या प्रमाणत मिळत आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी लाखोंची बक्षिसे व मोठमोठ्या ट्रॉफी ठेवण्यात येत आहेत. दुचाकी, सायकल, एलईडी टीव्ही देखील बक्षीस म्हणून विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येत आहे. तसेच स्पर्धेला जास्तीत जास्त नागरिकांनी यावे यासाठी प्रेक्षकांनाही बक्षिसे देण्यात येत आहेत. सर्वोच्य न्यायालयात बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यात आल्याने अनेक गावांमध्ये बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठीदेखील लाखोंची बक्षिसे देण्यात येत आहेत. यातून आपल्या पक्षाला कसा लाभ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी
निवडणुकीच्या काळात आता अनेकांनी पक्षांतर केल्याने पक्षात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि पक्षश्रेष्टींच्या नजरेत येण्यासाठी स्पर्धेत लाखोंची बक्षिसे देण्यासाठी हात मोकळा सोडण्यास इच्छुक मागेपुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. नवीन संभव्य रचनेतही अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढती शक्य असल्यामुळे चर्चेत राहण्याची ही संधी कुणीही सोडत नसल्याने दिसून येत आहे.