Organic Watermelon : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक कृषी बाजारपेठेवर दिसू लागला आहे. या संघर्षामुळे शेतमालाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक निर्यात करार रखडले आहेत. परिणामी, देशांतर्गत बाजारात शेतमालाचा पुरवठा वाढला असून, व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरात माल खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. मात्र, काही प्रगतशील शेतकऱ्यांनी यावर पर्याय शोधत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी आता रस्त्याच्या कडेला स्वतःच ‘ऑर्गॅनिक कलिंगड’ विक्री करताना दिसत आहेत. “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर शेतकरी ग्राहकांना ताजे आणि उच्च दर्जाचे कलिंगड उपलब्ध करून देत आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले हे कलिंगड ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळवत आहेत. याबाबत ऊंड्री येथील शेतकरी प्रवीण आबनावे म्हणाले की, व्यापाऱ्यांकडून मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे थेट विक्री केल्यास किमान खर्च तरी वसूल होतो आणि ग्राहकांनाही योग्य दरात चांगला माल मिळतो. “मध्यस्थ टाळल्यास दोघांचाही फायदा होतो,” असे आबनावे यांनी सांगितले. दरम्यान, या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या संकटात शेतकऱ्यांनी दाखवलेली जिद्द आणि नवकल्पना ही कौतुकास्पद असली, तरी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. Summer tips : उन्हाळात स्वःताला जपा नाही तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, वेळीच व्हा सावध.!