लसीकरणाला येणार वेग; कोविशिल्ड, कोव्हॅक्‍सिन लसींच्या 44 कोटी डोसची दिली ऑर्डर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या करोनावरील लसींच्या 44 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. तो साठा चालू वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत उपलब्ध होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्डच्या 25 कोटी आणि कोव्हॅक्‍सिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डरविषयीची माहिती दिली. संबंधित डोससाठी येणाऱ्या खर्चापैकी 30 टक्के रक्कम आगाऊ देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोविशिल्डचे, तर भारत बायोटेककडून कोव्हॅक्‍सिनचे उत्पादन केले जात आहे.

मोदींनी केलेल्या घोषणेनुसार मोफत लसी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात येतील. ती प्रक्रिया 21 जूनपासून सुरू होईल. त्यामुळे देशात सर्वांना मोफत लस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात, नागरिकांसाठी सशुल्क लसींचा पर्यायही उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 25 टक्के लसींचे डोस खासगी रूग्णालये घेऊ शकतील. तर, उर्वरित 75 टक्के साठा केंद्र सरकार खरेदी करेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.