‘महा’ चक्रीवादळामुळे शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश

मुंबई: महा चक्रीवादळामुळे 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यालाही या ‘महा’ चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 6 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत शाळा-कॉलेज परिस्थिती पाहून बंद ठेवण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महा चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गुजरात आणि महाराष्ट्रात तीन दिवस चक्रीवादळाचा धोका असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ताशी 100 किमी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पावसासाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.





