पाटण तालुक्यात शाळा स्वच्छतेचे गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश

पाटण – राज्य शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल आठ महिने शाळा बंद असल्याने शाळाभोवती झाडे, झुडपे, वेली गवत वाढल्याने शाळांचा परिसर विद्रूप झाला होता. विद्रूप झालेल्या शाळांबाबत दै.’प्रभात’ने “प्राथमिक शाळांचे अस्थित्व धोक्यात’ या शिर्षकाखाली आवाज उठवला. या बातमीने खडबडून जाग आलेल्या शिक्षण विभागाने तातडीने तालुक्यातील सर्व शाळांची स्वच्छता हाती घेतली केली.
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेल्या शाळा गेली आठ महिने बंद असल्याने विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागल्या होत्या. मात्र, बंद असणारे शाळांचे स्वच्छते अभावी विद्रुपीकरण झाले होते. शाळा भोवती गवत झाडे झुडपे वाढल्याने शाळांचे अस्तित्व दिसेनासे झाले होते. याबाबत दैनिक ‘प्रभात’मधून शाळा स्वच्छतेबाबत आवाज उठविण्यात आला होता. कातवडी, ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्रूपिकरणाची वस्तुनिष्ठ सचित्र बातमी मांडली.
अक्षरशः ही शाळा झाडवेलात लुप्त झाली होती. याबाबत दैनिक प्रभातने आवाज उठवताच गटविकास आधिकारी मीना साळुंखे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ तालुक्यातील शाळा स्वच्छतेबाबत आदेश दिले. तातडीने तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांची स्वच्छता करून घेण्याच्या सक्त सूचना दिल्या. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांकरवी शाळांची स्वच्छता मोहीम राबविली.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा पाया म्हणून शाळांकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच स्वच्छतेचे धडेही या ज्ञानमंदिरा दिले जातात. तर विद्यार्थ्यांमध्येही स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून शासनाने स्वच्छ भारत अभियान शाळात सुरू केले.
गृहराज्य मंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
“आपली शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा’ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने विशेष पुरस्काराची घोषणा केली होती. हा पुरस्कार तालुक्यातील तारळे विभागातील वेखंडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने काही वर्षापूर्वी पटकवला होता. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शाळांची अवस्था दयनिय झाली आहे. याबाबत वरिष्ठांकडून ही कार्यवाही होत नसल्याने तसेच शिक्षकांनाही शाळेच्या स्वच्छतेबाबत गांभीर्य नसल्याने शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. याकडे ना. शंभूराज देसाई यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.





