Oranges Side Effects: संत्री आरोग्यासाठी फायदेशीर, पण ‘या’ ५ लोकांनी खाण्यापूर्वी घ्यावी काळजी!
Oranges Side Effects संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटकही असतात. हे घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. मात्र, संत्री प्रत्येकासाठीच फायदेशीर असतात असे नाही. काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी संत्री खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संत्र्याचे अतिसेवन केल्यास काही त्रासही होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी संत्री खाताना काळजी घ्यावी.

Oranges Side Effects: संत्री म्हटली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबट-गोड चवीचे हे फळ खायला जितके चविष्ट आहे, तितकेच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटकही असतात. हे घटक शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. मात्र, संत्री प्रत्येकासाठीच फायदेशीर असतात असे नाही. काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी संत्री खाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. संत्र्याचे अतिसेवन केल्यास काही त्रासही होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी संत्री खाताना काळजी घ्यावी.
१. अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी घ्यावी काळजी
ज्या लोकांना वारंवार अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होतो, त्यांनी संत्री खाताना काळजी घ्यावी. संत्र्यामध्ये नैसर्गिक आम्लाचे प्रमाण असते. त्यामुळे काही लोकांना संत्री खाल्ल्यानंतर छातीत जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात संत्री खाल्ल्यास हा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या शरीराला किती प्रमाणात संत्री सहन होतात, याकडे लक्ष द्यावे.
२. किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
किडनीशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी संत्र्याचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. संत्र्यामध्ये पोटॅशियम असते. सामान्यतः पोटॅशियम शरीरासाठी महत्त्वाचे असते. मात्र, किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसल्यास शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण नियंत्रित ठेवणे कठीण होऊ शकते. रक्तातील पोटॅशियम वाढल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
३. दातांच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम
संत्र्यामध्ये असणारे नैसर्गिक आम्ल दातांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. वारंवार किंवा जास्त प्रमाणात संत्री खाल्ल्यामुळे दातांवरील इनॅमल म्हणजेच दातांचे संरक्षण करणारा बाहेरील थर कमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे दात संवेदनशील होऊ शकतात. काही वेळा दातांमध्ये किड होण्याचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे संत्री खाल्ल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरणे फायदेशीर ठरते. तसेच संत्री खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणे टाळावे.

Orange
४. पोटाच्या समस्या असणाऱ्यांनी मर्यादित सेवन करावे
संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. मात्र, एकाच वेळी खूप संत्री खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे, अपचन, पोटात मुरड येणे किंवा जुलाब होण्याचा त्रास होऊ शकतो. ज्यांची पचनशक्ती संवेदनशील आहे, त्यांनी संत्री खाताना प्रमाणाची काळजी घ्यावी. शरीराला किती प्रमाणात संत्री सहन होतात, त्यानुसार सेवन करावे.
५. सांधेदुखीचा त्रास असल्यास काय करावे?
काही लोकांचा असा समज आहे की संत्री खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि त्यामुळे सांधेदुखी किंवा अर्थरायटिसचा त्रास वाढू शकतो. मात्र, संत्री खाल्ल्याने सांधेदुखी वाढते, याला ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ सांधेदुखी आहे म्हणून संत्री खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. मात्र, संत्री खाल्ल्यानंतर वैयक्तिकरित्या काही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
संत्री खाणे पूर्णपणे बंद करावे का?
संत्री हे पोषक घटकांनी समृद्ध असलेले फळ आहे. त्यामुळे कोणतीही आरोग्य समस्या नसलेल्या व्यक्तींनी योग्य प्रमाणात संत्र्याचे सेवन करू शकतात. मात्र, अॅसिडिटी, किडनीचे आजार किंवा पचनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्यस्थितीनुसार आहार ठरवावा. कोणतेही फळ आरोग्यासाठी चांगले असले तरी त्याचे अतिसेवन टाळणे महत्त्वाचे आहे.





