Orange Alert – मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीने सोमवारी धुमाकुळ घातला. पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगरसह काही जिल्ह्यांत झालेल्या गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यातही दुपारी गारांचा पाऊस झाला असून, पाषाण परिसरात सर्वाधिक ४६ मिमी पावसाची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. रस्त्यांसह चौकांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुक मंदावली. समुद्रसपाटीपासून एक द्रोणीका रेषा पश्चिम विदर्भापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटकातून जात आहे. त्यामुळे राज्यात बदल झालेल्या हवामानामुळे गेल्या २४ तासांत ढगाळ वातावरण आहे. काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. सोमवारी (दि. ३०) दुपारी उन्हाचा चटका जाणवत असताना अचानक आकाशात काळे ढग भरून आले आणि सोसाट्याच्या वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. दिवसभरात मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. विशेषत: पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर पावसाने थैमान घातले. परिणामी काही गावांमध्ये गारपीठीने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, पुढील २४ तासात जळगाव, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत ३० ते ४० ताशी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर अन्य जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.