पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत अडथळा ठरू नये, यासाठी लकडी पुलावर “मूव्हेबल पूल’ बनवण्याची “आयडिया’ कॉंग्रेस गटनेते आबा बागूल यांनी दिली आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. हा प्रस्ताव बागूल यांनी “महामेट्रो’लाही दिला आहे.
लकडी पुलावरून जाणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील मूर्तींच्या उंचीचा प्रश्न मेट्रोच्या नियोजित ट्रॅकमुळे निर्माण झाला आहे. मेट्रो हवीच, परंतु मिरवणुकीची शानही राहिली पाहिजे. त्यामुळे पुलावरील मेट्रो ट्रॅक हा “काऊंटर वेट मेकॅनिझम ऑफ वॉटर टॅंक’ या तंत्रज्ञानाने बनवता येऊ शकणार असल्याचे बागूल यांनी सांगितले. आयआयटीयन आणि वास्तुविशारद असलेल्या अतुल राजवाडे यांनी ही आयडिया दिल्याचे बागूल म्हणाले. या पत्रकार परिषदेला राजवाडे आणि त्यांचे सहकारीही उपस्थित होते.
या पुलावर मेट्रो ट्रॅकची उंची सुमारे 20 फूट इतकी आहे. या “काऊंटर वेट मेकॅनिझम ऑफ वॉटर टॅंक’ मुळे ही उंची 40 फुटांपर्यंत वाढवता येऊ शकते. पूल उचलण्यसठी चार काऊंटर वेट टाक्यांमध्ये पाणी भरल्यास पुलाची उंची 20 फूट वाढेल आणि पाणी सोडून दिल्यास ती पूर्ववत होईल. तसेच विसर्जन मिरवणूक संपल्यावर ही उंची पूर्ववत करता येईल, असे राजवाडे यांचे म्हणणे आहे.
या पुलाचे वजन सुमारे 100 टन असून 25 टनाचे चार काऊंटर वेट वॉटर टॅंकच्या मदतीने तो उचलला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानासाठी सुमारे 8 ते 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे “मेंटेनन्स फ्री’ असेल असा दावा राजवाडे आणि बागूल यांनी केला आहे.
या तंत्रज्ञानाच्या चलनवलनासाठी उभारण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरवर व्युव्हिंग गॅलरी आणि सोलर पॅनेल तयार करून येणाऱ्या उत्पन्नातून काही वर्षांत मेट्रो पुलाचा खर्च निघेल आणि कायम उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे बागूल यांचे म्हणणे आहे.