विरोधकांचे तंत्र “खोटं बोला पण रेटून बोला’ – दिलीप वळसे पाटील

घोडेगाव-पेठ गटात गावभेट दौऱ्यात मतदारांशी साधला संवाद

घोडेगाव – आंबेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 30 वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून झालेली विकासकामे मतदारांना मान्य आहे; परंतु विरोधकांना दिसत नाहीत. हे त्यांचे दुर्दैव आहे. “खोटं बोला पण रेटून बोला’ अशी सैरभैर अवस्था विरोधी उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांची झाली आहे. येथील मतदार विरोधकांना त्यांची जागा त्यांना नक्‍की दाखवेल, असा विश्‍वास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्‍त केला.

आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांचा घोडेगाव-पेठ जिल्हा परिषद गटात गाव भेटदौरा झाला, त्यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. काळेवाडी, ढाकाळे, तळेकरवाडी, इंगवलेवाडी, आंबेदरा, धोंडमाळ, शिंदेवाडी, कोलदरा, गोनवडी, नारोडी, कोळवाडी कोटमदरा आदी गावांतील मतदारांच्या गाठीभेटी वळसे पाटील यांनी घेऊन त्यांची विचारपूस केली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास काळे, शरद बॅंकेचे संचालक सोमनाथ काळे, दिलीप काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अक्षय काळे, सखाराम काळे, माऊली घोडेकर, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे, ज्योती घोडेकर, जयसिंग काळे, गणेश काळे, वसंत काळे, रमेश घोडेकर, मयुरी शिंगाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी वळसे पाटील यांचाच पुन्हा मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे सांगितले. उमेदवार वळसे-पाटील म्हणाले की, ढाकाळे येथील पाणीपुरवठा योजना, आंबेदरा येथील पाझर तलाव, इंगवलेवाडी तळेकरवाडी येथील पाणीपुरवठा योजनांची व पाझर तलावाची कामे पूर्ण झाली आहेत. या भागात पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने व घोडेगाव ते तळेकरवाडीपर्यंत रस्ते पूर्ण झाल्याने येथील नागरिकांच्या दळणवळणाचा आणि पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

वळसे-पाटील यांच्यामुळे प्रत्येक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाले आहेत. गावांना जोडणारे पूल त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत. गावोगावचा संपर्क वाढून दळणवळणाची साधने वाढली आहेत. घोडेगाव आणि आदिवासी भागातून नेहमीच वळसे-पाटील यांना मताधिक्‍य राहिले आहे. यावेळीही त्यांना मोठे मताधिक्‍य मिळणार असून त्यांच्या सप्तरंगी महाविजयात या गावांचा मोठा वाटा असणार आहे.
– कैलास काळे, माजी सभापती, पंचायत समिती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)