विरोध कायम बंदिस्त पवना जलवाहिनीला

राज्यमंत्री बाळा भेगडे : मावळ गोळीबारातील मृत आंदोलकांना श्रद्धांजली

पवनानगर –
मावळ गोळीबारातील शहिद झालेले तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीमध्ये रुजू करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांवर तत्कालीन सरकारने सुडबुद्धीने गुन्हे दाखल केले होते, ते सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने निर्णय घेऊन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहे. तसेच या जलवाहिनीला माझा विरोध कायम असून, तो कायम राहणारच, असे मत राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी स्पष्ट केले.

आज पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला आठ वर्षे पूर्ण झाली आहे. 9 ऑगस्ट 2011 रोजी पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर बौर येथे झालेल्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलनाची धग विधानसभा व लोकसभेपर्यंत पोहोचली होती. बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील मृत आंदोलकांसाठी आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शंकरराव शेलार, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रवींद्र भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, माजी सभापती एकनाथ टिळे, कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दळवी, युवाध्यक्ष संदीप काकडे, संत तुकाराम कारखाना संचालक पांडुरंग ठाकर, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, शांताराम कदम, अलका धनिवले, निकिता घोटकुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना माजी आमदार दिंगबर भेगडे म्हणाले की, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे मत माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी व्यक्‍त केले आहे.

सन 2008 पासून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीय कार्यर्त्यांनी वेळोवेळी केले. परंतु तत्कालीन आघाडी सरकारने हा प्रकल्प करण्याचा अट्टहास केला होता. या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पामुळे या भागातील बागायती शेती व पाणी योजना बंद होण्याची भीती होती. तसेच सरकारची ऐकण्याची मन:स्थिती नव्हती. यामुळेच ही घटना घडली हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, ही आमची भूमिका ठाम असून, सरकार कोणाचे आहे. यापेक्षा ही योजना रद्द करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार श्रद्धांजली सभेत करण्यात आला. या वेळी श्रीरंग बारणे म्हणाले की, राजकीय जोडे बाजूला ठेऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. प्रास्तविक एकनाथ टिळे यांनी केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)