कोलकाता – निवडणूक आयोगाने अशा दहा नोटिसा बजावल्या, तरी मी मतदारांना धर्माच्या आधारावर विभाजित करण्यास विरोध सुरूच ठेवेन, असे प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
भाजपचे स्टार कॅंपेनर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात हिंदू व मुस्लीम मतपेढ्यांचा नेहमीच उल्लेख करतात. मग त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार का नोंदवली जात नाही, असा प्रश्न ममता यांनी डोमजूर विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान विचारला. तुम्ही मला कारणे दाखवा नोटिसा बजावू शकता, मात्र माझे उत्तर तेच राहील. हिंदू व मुस्लीम मतांमधील विभाजनाच्या मी नेहमीच विरोधात बोलेन. धार्मिक आधारावर मतदारांच्या विरोधातील माझी भूमिका मी बदलणार नाही, असे त्या म्हणाल्या. नंदीग्राममधील प्रचारादरम्यान मिनी पाकिस्तान शब्दाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध किती तक्रारी दाखल झाल्या आहेत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने ममतांवर नोटीस बजावली. मात्र भाजप उमेदवार पैसे वाटत असल्याचा ध्वनिचित्रफीत पुरावा तृणमूल कॉंग्रेसने सादर केला, तसेच भाजपच्या सभेला हजर राहण्यासाठी व त्या पक्षाला मतदान करण्यासाठी रोख रकमेचे कूपन वाटण्यात येत असल्याचीही तक्रार केली. त्याचे काय झाले, असा प्रश्न तृणमूलच्या प्रवक्त्या महुआ मोइत्रा यांनी विचारला. आयोगाने निदान नि:पक्षपातीपणाचे नाटक करावे, असा टोला त्यांनी हाणला.