आदर्शवत! मतदानानंतर नळवणेत विरोधकांचे ‘चहापान’

बेल्हे – नळवणे (ता. जुन्नर) येथील मतदान शांततेत पार पडले. शुक्रवारी (दि. 15) मतदान झाल्यावर सर्व मतभेद विसरून दोन पॅनेलचे उमेदवार व कार्यकर्ते चहा पाण्यासाठी एकत्र आले होते. विरोधक चहापाण्यासाठी एकत्र आल्याने वेगळा आदर्श गावाने दिल्याने नळवणे गावचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नळवणे गावात 9 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या, तर 7 जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. गावात दिवसअखेर 85 टक्के मतदान झाले. बाबाजी शिंदे व तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराया ग्रामविकास पॅनल तर बाळासाहेब गगे व हौशीराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुलस्वामिनी खंडेराय परिवर्तन पॅनल या असा प्रचार जोरदार झाला.
दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते मतदान झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी एकत्र जमले होते. चहापाणी वेळी आपापसांतील सर्व मतभेद विसरून गावच्या विकासावर चर्चा झाली. यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे व मॉडर्न इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे यांनी यावेळी ग्रामस्थांना गावचा एकोपा व सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
निवडणुका येतात जातात; परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये गावाचं नाव खराब होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारचं इथून पुढेही निवडणुकीत गालबोट लागू नये, असे आवाहन गावातील तरुणांना केले. तसेच गावातील भावी पिढी सुद्धा अशाच प्रकारे मतदान प्रक्रियेत सहभागी होईल, अशी आशा बाबाजी शिंदे यांनी व्यक्त केली. आदर्श गाव म्हणून आता नळवणे गावची चर्चा तालुक्यात होत आहे.





