नवी दिल्ली : जगभरात सध्या करोनाने चांगला थैमान घातला आहे. जगात करोनाबाधितांची संख्या ही 8 कोटींच्या पुढे गेली आहे. दरम्यान, या विषाणूच्या प्रतिबंधक लसीकरणाला देखील काही देशांमध्ये सुरुवात झाली आहे. मात्र, यांपैकी काही लस या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यातील एक म्हणजे चीनने विकसित केलेली लस. चीनने तयार केलेल्या लसीला मुंबईतील मुस्लिम समुदयाने या लसीला विरोध केला आहे. या लसीमध्ये डुक्कराच्या मांसातील प्रथिनांचा वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
रझा अकादमीचे सरचिटणीस सईद नूरी यांनी एका व्हिडिओ निवेदनाद्वारे सरकारला आवाहन केले आहे की, सरकारने चिनी लस भारतात लसीकरणासाठी मागवू नये. कारण या लसीमध्ये डुक्कराच्या मांसातील प्रथिनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच भारताने परदेशातून मागवली किंवा भारतात तयार करण्यात आलेल्या लसीमध्ये कुठल्या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे, याची यादी आम्हाला दाखवावी म्हणजे आम्हाला मुस्लिम समुदयासाठी लसीच्या वापरासंदर्भात घोषणा करता येईल. दरम्यान, फार्मा कंपन्यांकडून औषधांमध्ये डुक्कराच्या प्रथिनांचा वापर स्टॅबिलायझर म्हणून केला जातो. साठवणुकी दरम्यान आणि वाहतुकी दरम्यान संबंधीत औषध सुरक्षित आणि प्रभावी रहावे यासाठी त्याचा वापर केला जातो.
दरम्यान, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी देखील दावा केला आहे की, अमेरिकेत तयार होणाऱ्या करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीच्या रक्ताचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे ही लस भारतात वापरली जाऊ नये. या प्रकाराला चक्रपाणी यांनी आंतरराष्ट्रीय कारस्थान संबोधत हिंदू धर्म उद्वस्त करण्याचा हा डाव असल्याचं म्हटलं आहे. गोमुत्र किंवा शेणाचा वापर करण्यात आलेली लस किंवा औषधंच हिंदू वापरु शकतात. त्यामुळे परदेशी कंपन्यांनी त्यांची लस निर्मिती प्रक्रिया थांबवायला हवी.
डुक्कराच्या प्रथिनांचा वापर केलेल्या लसीला युएईत परवानगी
करोना प्रतिबंधक लसीमध्ये डुक्कराच्या प्रथिनांचा वापर हा औषध म्हणून मानवी शरीर संरक्षित करण्यासाठी करण्यात आला आहे. खाद्य म्हणून हा वापर केलेला नाही. त्यामुळे इस्लामचा नियम या ठिकाणी लागू होणार नाही, असे युएईतील फतवा काउन्सिलचे शेख अब्दुल्ला बिन बयाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युएईतील मुस्लिमांसाठी चीनच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे.