कराची – पाकिस्तानात लष्कराला सर्वांत शक्तिशाली मानले जाते. मात्र, त्या लष्कराविरोधात प्रमुख विरोधी पक्षांनी दंड थोपटल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांनी प्रथमच जाहीरपणे पाकिस्तानी लष्करावर आरोपांची सरबत्ती केली आहे.
पाकिस्तानातील राजकीय घडामोडींवर लष्कराचा प्रभाव असल्याचे संपूर्ण जगाला ज्ञात आहे. मात्र, पाकिस्तानातील राजकीय नेते आणि लष्कराकडून कधीच त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. तेथील विरोधी पक्षही लष्कराच्या हस्तक्षेपाबद्दल थेट बोलण्याचे टाळून आडवळणाने आरोप करतात.
मात्र, प्रथमच ते चित्र बदलले असून पाकिस्तान मुस्लीम लीग (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या प्रमुख विरोधी पक्षांनी लष्करावर जाहीर टीकास्त्र सोडले आहे. त्याचा प्रारंभ माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे सर्वेसर्वा नवाज शरीफ यांनी केला.
वर्षभरापासून लंडनमध्ये असलेल्या शरीफ यांनी मागील महिन्यात पाकिस्तानी लष्करावर निशाणा साधला. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेवर आणण्यासाठी लष्कराने 2018 मधील निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी शुक्रवारी शरीफ यांच्याच आरोपाची री ओढली.
पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराचा हस्तक्षेप संपुष्टात आणण्यासाठी लढा देण्याचा निर्धारही विरोधकांनी केला आहे.