पुणे जिल्हा | विरोधकांकडे ठोस काम नाही- आमदार कुल

पारगाव, (वार्ताहर)- विरोधकांकडे कोणतेच ठोस काम नसल्याने ते खोटा प्रचार करतायेत.या शिवाय त्यांच्या कडे दुसरे काही नाही. आता सिझनल पुढाऱ्यांचे दौरे चालू होतील परंतु ज्या ज्या वेळेस तालुक्यातील नागरिकांवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेस हे लोकांच्या मदतीला कधीच आलेले नाहीत.
मदतीला कोण आले व कोण येतात हे जनतेला चांगले माहिती झाले आहे, अशी टीका आमदार राहुल कुल यांनी विरोधकांवर केली.
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील सिद्धेश्वर कार्यालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व लाभार्थी मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी योजनेतील लाभार्थ्याला २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळत आहे. ते म्हणाले, दौंड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास टप्पा क्रमांक १ मधील १००० च्या आसपास घरांची कामे चालू असून ६०० घरकुले पूर्णत्वास आलेली आहेत.
दुसऱ्या टप्यातील १५०० घरकुले शासन स्तरावर प्रलंबित आहेत. या आठवडाभरात तेही मंजूर होतील, असा प्रयत्न चालू आहे. असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या तालुक्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींनी आमदार कुल यांना राख्या बांधल्या. सर्व महिला व पुरुष यांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले. प्रधानमंत्री आवास लाभार्थ्यांच्या वतीने आमदार कुल यांचा सत्कार करण्यात आला.
कुल म्हणाले की, वाघोली – राहू – पारगाव या ४१० कोटी रुपये मंजूर असलेल्या रस्त्याची वर्कऑर्डर निघाली असून महिन्यामध्ये काम चालू करण्याचा प्रयत्न आहे.
बेबी कॅनॉलमुळे पाटस ते फुरसुंगी दरम्यानच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दि. २ ऑक्टोंबर रोजी चौफुला येथे २०० कोटी रुपयांच्या बेबी कॅनॉल अस्तरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, माजी अध्यक्ष माऊली ताकवणे, नामदेव बारावकर, पंढरीनाथ पासलकर, गणेश जगदाळे, कांचन कुल, सुप्रिया नातू, उषा चव्हाण, तुकाराम ताकवणे, चंद्रकांत नातू, विकास शेलार उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास शेलार यांनी केले.
भीमा पाटसबाबत चुकीचा प्रचार
कुल म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत साखर कारखान्याच्या बाबतीत टीका- टिप्पणी होत होती. आता कारखाना चालू झाला. सभासदांना चांगला बाजारभाव मिळाला.
आता साखर कारखाना विकल्याच्या खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल विरोधक करीत आहेत. हा कारखाना सहकारी आहे. तो सहकारीच राहील. असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.





