दिल्ली दंगलींच्या पोलीस तपासावर विरोधकांनी दर्शवला अविश्वास

नवी दिल्ली – दिल्लीत फेब्रुवारीमध्ये झालेल्या दंगलींच्या पोलीस तपासावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पोलीस तपासाबाबत अविश्वास दर्शवला.
विरोधकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना एक संयुक्त निवेदन सादर केले. दंगलींवेळच्या दिल्ली पोलिसांच्या भूमिकेबाबत काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. का-एनआरसी-एनपीआरविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या कायकर्त्यांना आणि तरूणांना नाहक गोवण्याचा प्रयत्न होत आहे.
राजकीय नेत्यांनाही अडकवण्याच्या हालचाली होत आहेत. दंगलींवेळी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेकडे लक्ष वेधणारे काही व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिल्ली दंगलींचा तपास विश्वासार्ह आणि तटस्थ असणे गरजेचे आहे. मात्र, दिल्ली पोलिसांचा तपास गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे. त्यामुळे त्या तपासाची चौकशी विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
विरोधकांच्या शिष्टमंडळामध्ये अहमद पटेल (कॉंग्रेस), सीताराम येचुरी (माकप), डी. राजा (भाकप), कनिमोळी (द्रमुक) आणि मनोज झा (राजद) यांचा समावेश होता.





